
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सणासुदीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फुलावा आणि समाजातील वंचित घटकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, या सामाजिक बांधिलकीतून वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिखली येथे अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. लोकसहभागातून आयोजित या उपक्रमात कष्टकरी, वंचित, रोजंदारी कामगार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना किराणा साहित्य, दिवाळी फराळ आणि महिला व पुरुषांसाठी कपड्यांचे वाटप करण्यात आले.
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना अध्यक्ष मधुकर बच्चे म्हणाले की, समाजातील कष्टकरी, वंचित, रोजंदारी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिला भगिनींची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे आणि त्यांनाही सणाचा आनंद घेता यावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक व वस्तुरूपाने सहकार्य केले. लोकसहभागातूनच एवढा मोठा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविणे शक्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला फाउंडेशनचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, क्रांतीकुमार कडूलकर, सलीम सय्यद, अर्जुन पाटोळे, शंकर कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, दिलीप पेटकर, सदाशिव गुरव, सोनाली मन्हास, एम. के. शेख, सीता केंद्रे, दारासिंग मन्हास, ईशा नेत्रालयचे गणेश कांबळे, विशाल कुंडले, विपला फाउंडेशनच्या वैशाली गायकवाड, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी केले, तर सल्लागार रवींद्र सागडे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.



















