
लाखो लाडक्या बहिणींसह ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांचीही सरकारकडून फसवणूक! – काशिनाथ नखाते
लाडक्या बहिणींना वाऱ्यावर का सोडले ? विचारला सरकारला जाब
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारने मोठा गाजा – वाजा करून सुरू केलेली लाडकी बहीण योजनेतून आर्थिक बोजाचे कारणामुळे सुरुवातीला ८० लाख आणि नंतर ११ लाख अशा एकूण ९१ लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांचे अनुदान बंद केले आणि आनंदाचा शिधाही बंद केला त्यामुळे सर्वसामान्य श्रमिक, कष्टकरी, कामगार यांची या वर्षाची दिवाळी काळी साजरी होणार आहे. सरकारने सामान्य जनतेला आणि लाडक्या बहिणींना फसवले अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, घरेलु कामगार महासंघ, बांधकाम कामगार समन्वय समिती, फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे सरकारला जाब विचारला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, इरफान चौधरी, लाला राठोड, सुनील भोसले,सुषमा सूर्यवंशी, इंदू जाधव, लता साळुंखे
सुभा कावळे,राणी सोट, शितल शिंदे,पार्वती काळे प्रियंका जगताप आदीसह महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्ताने हक्काचे अनुदान देण्याऐवजी एक लिटर खाद्यतेल, एक किलो रवा, एक किलो मैदा आणि एक किलो साखर असा ‘आनंदाचा शिधा’ देण्याची योजनाही सरकारने गुंडाळली आहे. केवळ मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि निवडणुकीनंतर तब्बल ९१ लाख बहिणींना अपात्र ठरवून त्यांची फसवणूक का केली जात आहे? कष्टकरी, बांधकाम कामगार, सफाई कामगार, फेरीवाले आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा नेमका काय दोष, की त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे? असा सवाल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी उपस्थित केला.
या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेक आमदारांनीही यासंदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. सरकारने घरेलू कामगारांच्या ही योजना बंद केलेल्या आहेत. लाडक्या बहिणी हा अन्याय विसरणार नाहीत आणि आगामी निवडणुकीत सरकारला त्याची नक्कीच किंमत मोजावी लागेल, असा इशारा काशिनाथ नखाते यांनी दिला.



















