
सासवड शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा!
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाची मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांच्याशी भेट
सासवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सासवड नगरपरिषद हद्दीतील पथारीवाले, हातगाडीधारक आणि स्टॉलधारकांचे सर्वेक्षण करून त्यांना फेरीवाला प्रमाणपत्र द्यावे, तसेच पथविक्रेता कायद्यानुसार आवश्यक सुविधा व लाभ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात शिष्टमंडळाने सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि विविध प्रश्नांवर चर्चा केली.
शहरातील फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, त्यांच्या व्यवसायाची अधिकृत नोंदणी व्हावी आणि कायद्यानुसार त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण केले जावे, यावर यावेळी भर देण्यात आला. फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच, या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुढील १५ दिवसांत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते,सरचिटणीस तुषार घाटुळे, सासवड शहराध्यक्ष दिलीप गाढवे, अमित चिंबळकर, सुनील भुतकर, प्रदीप जैनक, अक्षय पोटे, शुभांगी कोलते, अमित पवार, राहुल आगवणे, चैत्राली जगताप, सुशील भंडे, लाला राठोड राजेश माने आदी उपस्थित होते. फेरीवाल्यांना कायदेशीर हक्क, सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी महासंघाच्या वतीने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.



















