
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोरी प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधित अधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे.
पिंपरी -चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी ३० ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे आणि अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेतील वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर महापालिकेचा कारभार पारदर्शक कसा राहणार, असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या मालमत्तेची, बँक खात्यांची तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेची आणि बँक खात्यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चुकीच्या पद्धतीने माया जमविल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात न्याय्य पद्धतीने तातडीने कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आता या मागणीवर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.



















