
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे व मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या विजयाचा आनंद पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांना पेढे वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी विजय मिळवला. या विजयामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, “हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून लोकशाहीवरील विश्वासाचा आणि सुशिक्षित मतदारांनी भ्रष्ट सरकारविरोधात दिलेल्या कौलाचा विजय आहे. या निकालातून महाविकास आघाडीच्या एकजुटीची ताकद, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे सामर्थ्य आणि जनतेचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.”
या आनंदोत्सवात माजी शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे, पक्षाच्या नेत्या सुलक्षणाताई शिलवंत-धर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, प्रदेश पदाधिकारी संदीप चव्हाण, वसीम पठाण, योगेश सोनवणे, प्रशांत काळेल, कमरूनिससा शेख, रेखा मोरे, कल्पना घाडगे, सचिव परमेश्वर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे, सुशांत गायकवाड, अश्रफ शेख, सुनील राठोड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















