
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ नागरिकांसह तरुण पिढीने कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे. व्यसनांमुळे शरीराची हानी होऊन विविध आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी व्यसनांऐवजी ध्यानधारणा आणि मनःशांतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सेविका रंजना बिद्रे यांनी केले.
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत त्या बोलत होत्या. यावेळी फकीरभाई पानसरे उर्दू माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सलाम इनामदार यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधत मोबाईलचा वापर कमीत कमी करण्याचा संदेश दिला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यवाह तथा ज्येष्ठ कवयित्री गीता सुतार यांनी प्रत्येकाने आपापले छंद जोपासावेत, असे सांगितले. यावेळी त्यांनी स्वरचित कविता सादर केली.
संघाचे अध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांनी संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील संकल्पना मांडल्या. सभेची सुरुवात जयलक्ष्मी अमीन, मालती कवडे आणि सायली चौधरी यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली.
ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच लकी ड्रॉमध्ये सरिता कालेकर या विजेत्या ठरल्या.
सभेचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे यांनी केले, तर प्रकाश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. सभेचे संयोजन विजय निकम, एकनाथ कालेकर, विजय सुर्वे आणि रवींद्र मांजरेकर यांनी केले. नियोजनासाठी गोविंद देशमुख, सचिन मोकाशी आणि इब्राहिम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.



















