
पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्र सेविका समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथे सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून जवळपास ३५० सेविका या पथसंचलनात सहभागी झाल्या.
शिस्तबद्ध संचलन, शस्त्रपूजन आणि शंखवादन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.या कार्यक्रमासाठी राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनीता जोशी, प्रांत प्रचार प्रमुख माया देशपांडे, पुणे विभाग कार्यकारिणी तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा कार्यवाहिका भारती तारे आणि प्रांत सहशारीरिक प्रमुख सायलीताई होमकर यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अनिता संदीप काटे, कुंदा भिसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पिंपळे सौदागर परिसरातून मार्गक्रमण करताना सेविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सघोष पथसंचलन केले. परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी या संचलनाचे उत्साहात स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या शंखवादनाने विशेष लक्ष वेधून घेतले.
मोठ्या संख्येने सेविकांचा सहभाग, शिस्तबद्ध संचलन आणि शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमामुळे पिंपळे सौदागर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



















