
पिंपरी चिंचवड भाजपाची नैतिकता संपली का? – धनराज आसवानी
आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कार्यक्रमाला भाजपचे पाठबळ – धनराज आसवानी
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील एककाळच्या नामांकित दि सेवा विकास सहकारी बँकेत आर्थिक घोटाळे करण्यात जबाबदार असल्याचा आरोप असणारे अमर मुलचंदानी यांनी विजयादशमी निमित्त पिंपरी येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे फलक पिंपरी चिंचवड शहरात लावण्यात आले आहेत. सेवा विकास बँकेत ५०० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अमर मूलचंदानी व इतर संचालक मंडळ, व्यवस्थापक यांच्यावर आहे. या आरोपाखाली मूलचंदानी व इतरांना अटक देखील झाली आहे. सध्या अमर मूलचंदानी हे वैद्यकीय उपचाराच्या कारणास्तव जामीन घेऊन बाहेर आहेत. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्षांशह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड भाजपाची नैतिकता संपली का असा प्रश्न माजी अध्यक्ष सेवा विकास सहकारी बँक धनराज आसवानी यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरासह पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या आर्थिक विकासात हातभार लावणारी विश्वासू बँक म्हणजे सेवा विकास सहकारी बँक असा या बँकेचा नावलौकिक होता. या बँकेत पाचशे कोटी रुपये पेक्षा जास्त आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप जाधवर समितीने अमरमूलचंदणी व तत्कालीन संचालक मंडळ व्यवस्थापक व बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवला आहे. या प्रकरणी मूलचंदानी आणि सह इतरांना न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आलेली आहे. या आरोपींनी वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली न्यायालयातून जामीन मिळवला आहे आणि राजरोसपणे अशा सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून न्यायालयाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात हे धूळफेक करत आहेत. ज्यांनी या बँकेतील शेकडो कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले, हजारो नागरिकांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशाचा अपहार केला, सहकार क्षेत्राला व पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांच्या नावाला काळीमा फासला आणि मा. न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी दिलेल्या जामीन चा गैरवापर करत आहेत अशा आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कार्यक्रमाला भाजपा चे पाठबळ मिळणे म्हणजे भाजपाची नैतिकता संपुष्टात आली आहे आणि या गोरगरीब नागरिकांच्या पैशाच्या अपहारास भाजपाचा देखील पाठिंबा आहे असा आरोप आणि माजी अध्यक्ष सेवा विकास सहकारी बँक धनराज आसवानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.



















