
चाकण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बजाज ऑटो लिमिटेड, चाकण येथील विश्वकल्याण कामगार संघटनेच्या सभासदांनी आपल्या न्याय्य मागण्यांकडे व्यवस्थापनाचे
लक्ष वेधण्यासाठी खंडेनवमीसारख्या महत्त्वाच्या दिवशी यंत्रपूजा न करता कंपनीकडून देण्यात आलेल्या मिठाईवर स्वेच्छेने
बहिष्कार टाकला. प्रलंबित वेतन कराराबाबत कामगारांच्या मनात असलेली नाराजी या कृतीतून व्यक्त झाली.
दरवर्षीच्या परंपरेनुसार विश्वकल्याण कामगार संघटनेच्या फलकाचे पूजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री.
दिलीप पवार यांनी उपस्थित कामगारांना खंडेनवमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदा प्रलंबित वेतन करारामुळे कामगारांमध्ये
नाराजीचे वातावरण असल्याने हा सण नेहमीच्या उत्साहाऐवजी साधेपणाने साजरा करण्यात आला. कामगारांनी फटाक्यांची
आतषबाजीही टाळली.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
वेतन करार २०२६ हा १ जुलै २०२६ पासून लागू करावा.
कामगारांना वर्षाला ४२ दिवसांची रजा मिळावी.
कंपनीच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कामगार आपल्या मेहनतीने उत्पादन आणि कंपनीच्या
विकासासाठी सातत्याने योगदान देत असताना त्यांच्या न्याय्य मागण्यांवरही व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित
आहे. प्रलंबित वेतन कराराचा प्रश्न मार्गी लावून कामगारांना न्याय द्यावा, अशी भावना कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी कामगारांना विश्वास दिला की, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी विश्वकल्याणकामगार संघटना ठामपणे आणि एकजुटीने लढा देत राहील. तसेच, कामगारांनी संयम राखून एकजूट कायम ठेवावी आणि संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
कामगारांच्या मनातील नाराजी ही सणाविरोधात नसून, प्रलंबित वेतन करार आणि न्याय्य मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे आहे.कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होऊन त्यांना योग्य न्याय मिळाल्यासच सणांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित
होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



















