
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथील विद्यार्थिनी आराध्या महोर हिने ९ व्या राष्ट्रीय बोक्से अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत U-9 मुलींच्या एकेरी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे आराध्याने शाळेसह पिंपळे सौदागर आणि महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आराध्याने १८ ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत, पुणे येथे आयोजित राष्ट्रीय बोक्से अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
चेअरमन संदीप काटे म्हणाले, “आराध्या महोरने राष्ट्रीय स्तरावरील बोक्से स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामागे तिची मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि क्रीडाक्षेत्रातील समर्पण आहे. लहान वयात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. आराध्याच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा मिळेल. तिच्या पुढील वाटचालीसाठी शाळेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.”
आराध्याच्या या यशाबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. मेहनत, सातत्य, समर्पण आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
प्राचार्या ज्योतिका मलकानी यांच्या मार्गदर्शनाखाली आराध्याने मिळवलेले हे यश शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.



















