
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त चिखली टाऊन हॉल येथे बालनाट्य आणि अभंग-भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ या उपक्रमांतर्गत चिखली टाऊन हॉल येथे सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेष मनोरंजनात्मक स्वरूपाच्या या बालनाट्याला महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाटकातील विनोदी प्रसंग, ग्रीझी अस्वल आणि चिंटू यांच्यातील धमाल जुगलबंदी, मजेदार गाणी आणि नृत्य यामुळे संपूर्ण वातावरणात हास्य आणि उत्साहाचे रंग भरले.
बालनाट्यातील ग्रीझी अस्वल आणि चिंटू या प्रमुख व्यक्तिरेखांभोवती रंगणारे प्रसंग विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. विनोद, गंमत, गाणी आणि नृत्याची सांगड घालत सादर करण्यात आलेल्या प्रसंगांमुळे विद्यार्थ्यांचा नाटकातील सहभागही वाढला. रंगमंचावरील कलाकारांच्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चिखली टाऊन हॉलमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या बालनाट्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी उभारण्यात आलेले भव्य आणि रंगीत नेपथ्य. बालमनाला आकर्षित करणाऱ्या रंगसंगती आणि दृश्यरचनेमुळे नाटकातील कल्पनाविश्व अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले. त्यासोबतच गाणी आणि नृत्याच्या सादरीकरणामुळे नाटकाला मनोरंजनाची अधिक रंगत आली. हास्य, गाणी, उत्कृष्ट प्रकाशयोजना, नेपथ्य आणि ग्रीझी-चिंटूच्या धमाल प्रसंगांनी रंगलेल्या या बालनाट्याचा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अभिजात मराठी भाषा सप्ताहातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि मराठी रंगभूमीशी त्यांचा मनोरंजक पद्धतीने परिचय झाला.
*रसिकांनी अनुभवला अभंग आणि भक्तीगीतांचा भक्तिमय स्वरप्रवास*
बालनाट्यानंतर चिखली टाऊन हॉल येथे ‘सा रे ग म प’ गायक फेम ज्ञानेश्वर मेश्राम, गायिका कल्याणी देशपांडे आणि सहकाऱ्यांचा अभंग व भक्तीगीतांचा ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. अभंग आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून भक्तिरसाची अनुभूती देणाऱ्या या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संतपरंपरेतील अभंग, भक्तिगीते आणि त्यातून व्यक्त होणारी अध्यात्मिक भावना यामुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले.
‘अभंगवारी’च्या सादरीकरणातून अभंग आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून मराठी संतपरंपरेतील भक्ती, अध्यात्म आणि संगीताचा सुरेल संगम रसिकांसमोर आला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि भक्तिसंगीताच्या समृद्ध परंपरेचा अनुभव रसिकांना घेता आला.



















