
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून, पुणे पदवीधर मतदारसंघातून (Pune Graduate Constituency) भाजपने धक्कातंत्र अवलंबत डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. या मतदारसंघातून शरद लाड यांच्यासह अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असताना, भाजपने शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील एक अत्यंत अभ्यासू व प्रभावी चेहरा म्हणून डॉ. स्मिता जाधव यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. उच्चशिक्षित, तरुण आणि महिला वर्गात मोठा जनाधार असलेल्या स्मिता जाधव यांच्या उमेदवारीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. स्मिता जाधव या शिक्षण, माध्यम, उद्योग आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत. ‘पुढारी पब्लिकेशन’च्या त्या संचालिका असून ‘पुढारी’ वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष व मुख्य संपादक योगेश जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.
शिक्षणाच्या बाबतीत डॉ. स्मिता जाधव अत्यंत उच्चविद्याविभूषित आहेत.
पीएच. डी. (Ph.D. Education) : शिक्षणशास्त्र विषयात डॉक्टरेट.
एमबीए (MBA Financial Management) : अर्थशास्त्र व वित्तीय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी.
बी.ई. (B.E. Computer) : संगणक अभियांत्रिकीची (Computer Engineering) पदवी.
सध्या सांभाळत असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
प्र-कुलगुरू (Pro-Vice Chancellor) : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी (पुणे).
सचिव (Secretary) : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी.
संचालिका (Director) : ‘पुढारी’ पब्लिकेशन.
कार्यकारी संचालिका (Executive Director) : टोमॅटो 94.3 एफएम (Tomato 94.3 FM) आणि आपलं एफएम 91.9 (Aapla FM 91.9).
अध्यक्षा : कस्तुरी क्लब (Kasturi Club).
डॉ. स्मिता जाधव यांनी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र व पुणे परिसरातील 18 हजारांपेक्षा जास्त महिलांचे एक मोठे नेटवर्क उभे केले आहे. या माध्यमातून महिलांना व्यवसाय-उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि सामाजिक सहभाग वाढवणे यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार
भारत सन्मान निधी पुरस्कार
ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन अवॉर्ड (Global Women Inspiration Award)
एज्युप्रन्योर ऑफ द इयर (Edupreneur of the Year)
बेस्ट सीईओ (Best CEO Award)
आऊटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन
: भाजपची विधानपरिषदेसाठी जाहीर झालेली यादी
23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने तीनही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत:
पुणे पदवीधर – डॉ. स्मिता योगेश जाधव
नागपूर पदवीधर – सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक – कौस्तुभ गावडे



















