
५ मोटारसायकली व स्पेअरपार्ट्स असा २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी ताब्यात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बावधन पोलिसांनी मोटारसायकल चोरी करून त्यांचे स्पेअरपार्ट्स वेगवेगळे करून भंगारात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कारवाई करत पाच मोटारसायकली तसेच मोटारसायकलींचे स्पेअरपार्ट्स असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बाणेर परिसरातून मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.३० ते ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत बाणेर येथील लेझर सोसायटी परिसरातून MH-13-EW-5847 क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील ९० ते १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान चोरीची मोटारसायकल इंदिरा चौक, पिंपळे निलख परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढत कारवाई केली.
या प्रकरणात पवन महीआप्पा भजनी (वय २५) आणि क्रुशिकेश शाहाजी साठे (वय १९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपी चोरीच्या मोटारसायकलींचे स्पेअरपार्ट्स काढून भंगार दुकानदारांना विकत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पाच मोटारसायकली व इतर स्पेअरपार्ट्स असा २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

















