
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरात अवघ्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप आणि समाजमाध्यमांवरील एक ‘रील’ सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी संबंधित ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन तिची चौकशी केली. तसेच संबंधित सोसायटीचे व्यवस्थापन, स्थानिक पदाधिकारी, शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेण्यात आली. या चौकशीत १२३ मुलींच्या अपहरणासंदर्भात कोणताही पुरावा, पोलिस नोंद किंवा तक्रार आढळली नाही.
त्यामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेली ही माहिती अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच त्यांची पुढे प्रसारित करून अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

















