
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुंजीर चौक येथील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील सार्वजनिक शौचालय गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शौचालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सार्वजनिक वापरासाठी असलेल्या सुविधेची दुरवस्था झाली आहे.
याशिवाय, शौचालयाच्या इमारतीतील गाळ्यांचा अनधिकृत पद्धतीने वापर होत असल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. ई-सेवा केंद्रासाठी असलेल्या गाळ्यात पंचर काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.
या सर्व प्रश्नांकडे संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे यांनी आज घटनास्थळी भेट देत संबंधित ठेकेदार सुबोध ठाकूर यांच्याकडे जाब विचारला.
दोन वर्षांपासून शौचालय बंद असताना कधी पाण्याचे, तर कधी वीजेचे कारण सांगितले जात आहे. मात्र, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तोंडावर हात ठेवून मूक निषेध नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, दोन दिवसांत शौचालय सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने देण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे तसेच नगरसेविका अनिता संदीप काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी कुंदा भिसे कटीबद्ध आहेत.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून हे सार्वजनिक शौचालय नागरिकांच्या सेवेत सुरू करावे, हीच मागणी.!

















