
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून चिंचवड गावातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेले मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले आहे. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या दिशेने वाढत आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतराची उपाययोजना करण्यात येत आहे.
पूरस्थितीमुळे मंदिर परिसरातील हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसराचे दृश्य पाहण्यासाठी भाविक व नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने पोलिस व प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



