
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी अनुप मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोरे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा कामाचा झपाटा, व्यापक जनसंपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभागाची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
अनुप मोरे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना राज्यभरात संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. युवकांना पक्ष संघटनेशी जोडणे, विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करणे तसेच पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि राज्यभरातील जनसंपर्काचा उपयोग ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठाच्या माध्यमातून करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
महाराष्ट्रातील वाहतूक क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न तसेच वाहनचालक, वाहतूक व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट उद्योजक आणि या क्षेत्रातील अन्य घटकांच्या समस्या शासन व पक्षाच्या माध्यमातून मांडण्याची महत्त्वाची जबाबदारी मोरे यांच्यावर राहणार आहे. वाहतूक क्षेत्रातील प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर प्रभावीपणे आवाज उठविण्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे.
या नियुक्तीबद्दल भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अनुप मोरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या संघटनात्मक अनुभवाचा आणि व्यापक जनसंपर्काचा पक्षाला तसेच राज्यातील ट्रान्सपोर्ट क्षेत्राला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

















