
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी (८ जुलै) दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा आषाढी वारी पालखी प्रस्थान कार्यक्रम आता अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीवरील पूल आणि आळंदीतील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात झाली आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी पुलावरील कठडे आणि विजेचे खांब वाहून गेले आहेत, तर आळंदी नगरपरिषदेचे वॉटरहाउस पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अशक्य झाले आहे.
मोबाईल टॉयलेट्स गेले वाहून
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी उभारलेली दर्शनबारी, तसेच सोहळ्यासाठी लावलेले अनेक मोबाईल टॉयलेट्स पुरात वाहून गेले आहेत. संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, तंबू आणि राहुट्यांच्या जागेवर प्रचंड चिखल झाल्याने भाविकांची व्यवस्था करणे आणि त्यांना निवारा देणे प्रशासनाला अशक्य झाले आहे.
प्रत्येक दिंडीतून १० वारकरी निवडणार
या परिस्थितीची दखल घेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी (८ जुलै) दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा आषाढी वारी पालखी प्रस्थान कार्यक्रम आता अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ‘श्रीं’च्या रथापुढील दिंडी क्रमांक १ ते २७ आणि रथामागील दिंडी क्रमांक १ ते २० मधील प्रत्येक दिंडीतून १० वारकरी, असे एकूण ५६० वारकरी उपस्थित राहतील.
परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी आणि प्रतिष्ठित अशा एकूण ५०० व्यक्तींना नारळप्रसादासाठी प्रवेश दिला जाईल. याशिवाय मानाचे खांदेकर, कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता सेवक आणि पोलीस मिळून एकूण १६६० व्यक्तींच्या उपस्थितीत हा पालखी प्रस्थान सोहळा पार पाडला जाईल.
आळंदीतील ही पूरस्थिती आणि एकूणच नैसर्गिक वातावरण पाहता, संस्थान कमिटीने सर्व वारकरी बांधवांना नम्र आवाहन केले आहे की, त्यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता आळंदीला येऊ नये. पाऊस आणि वातावरणाचा अंदाज घेऊन पुढील मुक्कामी सोहळ्यात कसे सहभागी व्हायचे, याबाबात संस्थान कमिटी लवकरच पुढील निवेदन प्रसिद्ध करेल. देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी केले आहे.



