खासदार निधीतून पवनानगर, कांब्रेत विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन; मावळात पुन्हा विकास कामांचा धडाका


मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक खासदार निधीतून मावळमधील काले कॉलनी, पवनानगर, ग्रुप ग्रामपंचायत कांब्रे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यात आले. खासदार बारणे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ, भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. खासदार बारणे यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये मावळात पुन्हा विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे.



खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. मावळ तालुका वाड्या-वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव होता. अंतर्गत रस्ते नव्हते. त्याकरिता खासदार बारणे यांनी मागील दोन टर्ममध्ये खासदार निधी आणि जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले. समाज मंदिरे, पाणी टाक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. मावळातील अनेक गावात अंतर्गत रस्ते झाले आहेत. त्यामुळे मावळातील नागरिकांना खासदार बारणे यांच्यावर विश्वास टाकत तिसऱ्यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

आता पुन्हा खासदार बारणे यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक खासदार निधीतून विकास कामे सुरू केली आहेत. मावळ दौऱ्यावर असताना ग्रुप ग्रामपंचायत कांब्रेसाठी दिलेल्या 50 लाखाच्या कामाचा शुभारंभ केला. त्यात सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते, समाज मंदिराच्या कामाचा समावेश आहे. त्याचबरोबर पवनानगर येथील पवना विद्या मंदिराकडे जाण्यासाठी स्थानिक खासदार निधीतून 12 लाख रुपये खर्च करून रस्ता विकसित केला होता. या रस्त्याचे लोकार्पण खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, विकासाच्या दृष्टीकोणातून सर्वाधिक निधी मावळला दिला आहे. मावळात गावे विस्तारली आहेत. प्रत्येक गावात जाण्यासाठी तसेच अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला. त्याची पोहोचपावती जनतेने दिली. तिसऱ्यांदा मला सेवा करण्याची संधी दिली. राज्यात पुन्हा चांगल्या विचारांचे महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. भरघोस निधी मिळत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निधीतून मावळात मोठी विकास कामे केली. यापुढेही विकास कामे सुरूच राहतील.








