
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनुसूचित जाती आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या वतीने(मंगळवार, १८ ऑगस्ट) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाची सुरुवात १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन येथून होणार असून, तेथून मोर्चा निगडी तहसील कार्यालयाकडे मार्गक्रमण करणार आहे. मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवून सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये विभागनिहाय बैठका, जनजागृती मोहीम तसेच समाजबांधवांशी प्रत्यक्ष संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक विभागातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी व्हावेत, यासाठी समितीच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.
वाल्मिकी, मादीगा आणि खाटीक समाजाचाही पाठिंबा
या जनआक्रोश मोर्चाला वाल्मिकी, मादीगा व खाटीक समाजानेही समर्थन दिले असून, संबंधित समाजबांधव मोर्चात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकल मातंग समाजाला आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चात पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सकल मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने, शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
















