मावळात ठाकरे गटाला धक्का; तालुका संघटक अमित कुंभार यांचा शिवसेनेत प्रवेश


मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळचे तालुका संघटक, पवनानगरचे माजी उपसरपंच अमित कुंभार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कुंभार यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.



तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवा तालुका अधिकारी दत्ता केदारी, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे यावेळी उपस्थित होते.

अमित कुंभार हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुका संघटक म्हणून काम पाहिले आहे. कुंभार समाजाच्या उन्नती, प्रगतीसाठी काम केले आहे. त्यांचे संघटन कौशल्य अतिशय चांगले आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. पवनानगर ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी पुन्हा खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे मावळात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
खासदार बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटासह सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेत कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखला जातो. प्रत्येकाला न्याय दिला जातो. अमित कुंभार हा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. अनेक वर्षापासून तो चांगले काम करत आहे. अमित पुन्हा आपल्यासोबत आल्याचा आनंद आहे.








