वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेंची कस्पटे कुटुंबीयांना भेट, कठोर कारवाईचे आश्वासन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी पुढे सरसावले आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांनी आश्वासन दिले की, ज्यांनी वैष्णवीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्या सर्व दोषींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. राज्य सरकार या प्रकरणात गांभीर्याने कार्यरत असून दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘आपल्या मुलीला आई वडील एवढ्या लाडाने वाढवतात, त्यांना फार ऐश्वर्य मिळावं यासाठी त्यांचं पालनपोषण करतात. त्यांचा विवाह करताना आपलं सर्वस्व पणाला लावतात, त्यांच्या संसाराला सतत हातभार लावत असतात. मात्र आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आई-वडिलांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. मी राज्याची एक मंत्री आणि महिला म्हणून त्यांना आश्वस्त केल आहे. त्यांच्या मनात आता कोणतीही शंका राहणार नाही. ज्यांनी त्यांच्या मुलीवर अन्याय केला, अत्याचार केला तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला. त्या सगळ्यांवर अत्यंत कडक कारवाई होईल, असा शब्द मी त्यांना दिला आहे.’














