‘दगडूशेठ’ च्या गणेशोत्सव सजावटीचा वासापूजनाने श्रीगणेशा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; विश्वस्त, पदाधिकारी यांची उपस्थिती
पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील श्री जटोली शिवमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगण या सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले. जय गणेश आणि मंत्रपठणाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, राजाभाऊ सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, इंद्रजित रायकर, राजूशेठ सांकला, राजू चिंचोरकर, तुषार रायकर आदी उपस्थित होते.
माणिक चव्हाण म्हणाले, उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते, असे मानले जाते.
गणेशोत्सवात साकारण्यात येणा-या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले हे करीत आहेत.