ताज्या घडामोडीपिंपरी

“विचारवंतांच्या कृतीने जोडलेला महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

Spread the love

 

सांगली,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “विचारवंतांच्या कृतीने जोडलेला महाराष्ट्र आज तोडण्याचे काम सुरू आहे!” असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली येथे केले.

पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, इस्लामपूर शाखा आणि बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनात प्रा. डॉ. सबनीस बोलत होते. साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, डॉ. दीपक स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. वाळवा शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. बी. एस. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित केलेल्या पाली – मराठी शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “विविध जाती – धर्मातील चांगुलपणाच्या तत्त्वज्ञानाची बेरीज शिकवण्याची जबाबदारी आजच्या शिक्षकांवर आहे. बाबा भारती यांनी सर्वधर्मीय प्रबोधनाचे मोठे काम केले. सध्या जातीपातीत समाज विभागला जातो आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण व्यवस्थेने विश्वसंस्कृतीच्या भवितव्याला आकार देण्याचे कार्य करावे!” सुनीताराजे पवार यांनी, “अध्यात्म, ज्ञान, संस्कार यांचे एकत्रीकरण झाले पाहिजे. आपल्याकडे भाषेच्या अस्मितेची कमतरता आहे. साहित्य नवा आशावाद देत असते. त्यासाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे. संवेदना आणि माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी अशी संमेलने आवश्यक आहेत!” असे विचार मांडले.

ॲड. बी. एस. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करताना भारती परिवारातील तीन पिढ्यांशी माझे ऋणानुबंध आहेत, असे नमूद केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “महेंद्र भारती हे वडिलांच्या पश्चात त्यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असून जन्मशताब्दीनिमित्त प्रतिष्ठानमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत!” अशी माहिती दिली.

मनीषा भोसले यांनी पाली भाषेचे महत्त्व कथन केले. डॉ. अर्चना थोरात यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वागताध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत केले. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. विजय कांबळे, राजरत्न गाडे, निमीष भारती, प्रकाश कांबळे, रमेश ढाले, सचिन कांबळे, आर. के. कांबळे, आनंद कांबळे, धर्मवीर पाटील, संभाजी मस्कर, हंबीरराव पाटील, संजय मुळे, दत्ता कुरळूपकर, रवींद्र भारती, सत्यजित मस्कर, डॉ. पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपक स्वामी यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button