चिंचवडमधून भाजप पक्षाने अश्विनी जगताप किंवा चंद्रकांत नखाते यांनाच उमेदवारी द्यावी – राज तापकीर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विधानसभा निवडणुकीवरून रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघ परीवर्तनाच्या वाटेवर आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या पिंपरी- चिंचवडच्या आमदार झाल्या. काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागेल. चिंचवड विधानसभेची उमेदवारी आमदार अश्विनी जगताप किंवा माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांना पक्षाने द्यावी असे मत महाराष्ट्र प्रदेशचे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राज तापकीर यांनी व्यक्त केले.
स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जडणघडणीमुळे आणि विकासाच्या अजेंड्यामुळे चिंचवड मतदारसंघ भाजपसाठी केव्हाच सेफ झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी. श्रीमती. अश्विनी लक्ष्मण जगताप या विनासायास या मतदारसंघाच्या आमदारही झाल्या. त्यामुळे चिंचवड मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. परंतु, स्व. आ. लक्ष्मण जगताप यांचा मतदारसंघावर असणारा प्रभाव त्या टिकविण्यात काहीशा मागे पडल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील सैरभैर झाले आहेत. आताही त्या या मतदारसंघातून विधानसभेसाठी पुन्हा इच्छुक असल्याचे समजते.
आमदार अश्विनी जगताप किंवा ‘स्मार्ट रहाटणी’चे शिल्पकार आणि तीन टर्म नगरसेवकपद भूषविणारे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते दोघांपैकी एकाला पक्षाने उमेदवारी दिली तर चिंचवड विधानसभेत बदल हा घडणार च अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते करत आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते म्हणाले, ” स्व. आ. ‘लक्ष्मणभाऊ’ यांनी अगदी सुरुवातीला गावपातळीवर ते आता पिंपळे गुरवपासून ते रावेत-किवळे या शेवटच्या उपनगरापर्यंत कार्यकर्त्यांची फौज तयार केली. त्यांच्या हाकेला तत्पर साद देणारे असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडवलेत. त्यातील अनेकांनी मोठी पदही भूषविली.
काहींना निष्ठा राखूनही पदरी निराशाच आली. अशा कार्यकर्त्यांना लक्ष्मणभाऊंनी अखेरच्या टप्प्यात माझ्यानंतर सत्ता विकेंद्रीकरणात सहभाग घ्या, अशी सूचना केली होती. याचाच अर्थ लक्ष्मणभाऊ घराणेशाहीच्या विरुद्ध होते. दरम्यान त्यांच्या जाण्याने त्यांचा वसा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना जपता आलेला नाही. राजकीय वर्तुळात मोठी पोकळी जाणवत आहे. कार्यकर्त्यांचा दिशादर्शक हरपला आहे, अशी भावना चिंचवड मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. चिंचवडमधून जगताप कुटुंबातील हक्कदार अश्विनी जगतापच असल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे.तसेच स्व. लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये.
मुळात आधीच विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबात भाजप उमेदवारी देणार नाही. आणि जरी पक्षाने उमेदवारी दिली तरी अश्विनी जगताप किंवा चंद्रकांत नखाते यापैकी एकाला पक्षाने उमेदवारी द्यावी, कार्यकर्त्यांनी अशी मागणी भाजप पक्षाकडे केली आहे. कारण भाजपमध्ये घराणेशाहीला झुकते माप दिलं जात नाही. त्यामुळे चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवण्यावर मी ठाम असल्याचे चंद्रकांत नखाते यांनी सांगितले.
याबाबत आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी सुद्धा चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिंचवड विधानसभा लढवण्यासाठी मी ठाम आहे.