राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील २,०४,१५४ बालकांना लसीकरण
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मनपा परिसरामध्ये केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार आज दि. ३.३.२०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सन १९९५ पासून आयोजीत होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे हे २८ वे वर्ष आहे. या कालावधीत मनपा क्षेत्रात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
मोहिमेचा उद्घाटन समारंभ डॉ. लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे हस्ते मनपाच्या थेरगाव येथील रुग्णालयामध्ये संपन्न झाला. यावेळी डॉ. अनिरुद्ध देशपांडे,सहाय्यक संचालक व पल्स पोलिओ नोडल ऑफिसर महाराष्ट्र शासन, डॉ. अभयचंद्र दादेवार अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. अंजली ढोणे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. किशोरी नलावडे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. शिवाजीराव ढगे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. वर्षा वालावलकर जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. राजेंद्र फिरके जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. संध्या भोईर वैद्यकीय अधिकारी, डॉ. अभिजीत सांगडे वैद्यकीय अधिकारी, टाटा मोटर्सचे सुनील तिवारी, प्लँट हेड पिंपरी व प्रणवकुमार एच.आर. हेड (CVBU) हे अधिकारी तसेच नवीन थेरगाव रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण ११०९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने।रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९६४ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन,मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी ५८ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ८१ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे.
मनपा परिसरात ११०९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ७५ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २५५ पर्यंवेक्षक व ३२०३ लसीकरण लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, मॅनेजमेंट व ईतर शाखेमधील महाविद्यालयीन विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम,बालवाडी शिक्षिका, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, रोटरी क्लबचे स्वयंसेवक, टाटा मोटर्स मधील स्वयंसेवक व इतर विविध सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
दिनांक ४.३.२०२४ पासून मनपा कार्यक्षेत्रातील ५ वर्षाखालील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणीत केलेली आहे. तसेच लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षीत आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांचे दि. ३.३.२०२४ रोजी पल्स पोलिओ लसीकरण झाले नसेल त्यांना घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घ्यावे असे नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे.