राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेस उत्साही प्रतिसाद खेड तालुक्यात ५८ हजार ६८ बालकांना पोलिओचे लसीकरण
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत खेड तालुक्यात ५८ हजार ६८ बालकांना लस पाजण्यात आली. या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात पल्स पोलिओ मोहीमेस उत्साही प्रतिसाद मिळाला. मोठ्या उत्साहात मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांचे मार्गदर्शना खाली मोहीम राबविण्यात आली. खेड तालुका पंचायत समिती येथे पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आरोग्य विभाग, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. खेड तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६२ आरोग्य उपकेंद्र आहेत. यामध्ये एकूण ३८१ पोलिओ बूथ चे आयोजन करण्यात आले होते. पल्स पोलिओ मोहीम 3 मार्च रोजी व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. त्यानंतर ५, ६ व ७ मार्च २०२४ रोजी घरभेटी द्वारे एकूण ६० हजार पेक्षा अधिक बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार असल्याचे डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत ५८ हजार ६८ बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली. यासाठी ८३ पर्यवेक्षक यांनी संनियंत्रण केले. ३८१ बुथचे नियोजन करण्यात आले होते. मोबाईल टीम १६ आणि बस स्टॅंड, टोल नाका अशा महत्वाचे ठिकाणी १० ट्रांजिट टीम तैनात केल्या होत्या. ५,६ आणि ७ मार्च रोजी घरभेटीचे माध्यमातून उर्वरित बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. भारत जरी पोलिओ मुक्त असला तरी शेजारी राष्ट्रांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने तो पुन्हा येऊ शकतो. यामुळे सर्वानी दक्षता घेण्याची गरज आहे. आपल्या बालकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री करून घेऊन पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. खेड तालुक्यात या मोहिमे मध्ये विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला