

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील टपरी, पथारी, हातगाडीधारक आणि फळभाजी विक्रेत्यांना हक्काचे गाळे व व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने केवळ बैठकांचा देखावा न करता तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी आक्रमक मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समितीच्या सदस्या तथा टपरी-पथारी-हातगाडी पंचायतीच्या मुख्य संघटिका आशा बाबा कांबळे यांनी केली आहे.
फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर अनेक बैठका होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. २००३ पासून कष्टकऱ्यांचे नेते व टपरी-पथारी-हातगाडी पंचायत आणि राष्ट्रीय फेरीवाला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे. २००५ मध्ये फेरीवाल्यांचे परवाने रद्द झाल्यानंतर मोठा संघर्ष उभारण्यात आला. त्यानंतर २००७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत देशातील पहिला फेरीवाला कायदा मंजूर करून घेण्यात यश आले.
मात्र, ज्या शहरातून कायद्याची सुरुवात झाली, त्याच शहरात आज त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत आशा कांबळे यांनी व्यक्त केली. एका बाजूला अतिक्रमण कारवाईतून फेरीवाल्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले जातात, तर दुसरीकडे पुनर्वसनासाठी ठोस निर्णय घेतला जात नाही. विशेषतः मागासवर्गीय, परित्यक्ता, विधवा आणि गरीब कष्टकरी महिलांवर अन्याय होत आहे.
फेरीवाल्यांना हक्काची जागा आणि गाळे मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शहरातील फेरीवाल्यांना सोबत घेऊन महापालिकेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आशा बाबा कांबळे यांनी दिला.



















