

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरातील सहकारी पतसंस्थांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या अग्रभागी आणण्याच्या दृष्टीने पुण्यातील अक्षर सोल्यूशन्स संस्थेने पुढाकार घेतला असून, या माध्यमातून सहकारी पतसंस्थांसाठी डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रशिक्षण योजनेमुळे प्रवासाचा वेळ, खर्च आणि वेळेच्या बंधनातून मुक्त करणारी ही योजना सहकारी क्षेत्रात एक नवे वळण ठरणार आहे. या उपक्रमाला सहकारी पतसंस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अधिकारी व कर्मचारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून पतसंस्थेचे आर्थिक नियम, कर्ज वसुली प्रक्रिया, लेखा पद्धती याचा ऑनलाईन लाभ घेत आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अद्वैत माडगूळकर यांनी दिली.
कर्मचारी ज्ञानवृद्धी, कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल आहे. डिजिटल माध्यमातून सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याकडे सहकारी पतसंस्थांचा कल वाढत आहे. या डिजिटल माध्यमातून दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणामुळे पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात आर्थिक नियम, कर्ज व्यवस्थापन, वसुली प्रक्रिया, लेखा पद्धती, वैधानिक अनुपालन आणि तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केवळ प्रमाणपत्रापुरते प्रशिक्षण न देता, त्यांच्या ज्ञानात सातत्याने भर पडणे आणि प्रत्यक्ष कामकाजात त्याचा उपयोग होणे आवश्यक ठरत आहे.
या प्रशिक्षण उपक्रमामध्ये सहकार कायदा, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज व वसुली व्यवस्थापन, एनपीए व्यवस्थापन, जोखीम-भारित मालमत्तेच्या तुलनेत भांडवलाचे प्रमाण (CRAR), कर अनुपालन तसेच सहकारी संस्थांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे. या ऑनलाईन प्रशिक्षण योजनेमुळे प्रवासाचा वेळ, खर्च आणि वेळेच्या बंधनातून मुक्त करणारी ही योजना सहकारी क्षेत्रात एक नवे वळण ठरेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
“सहकारी संस्थांमधील प्रशिक्षण ही केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया न राहता, ती अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृद्धीची आणि कार्यक्षमता वाढविण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया बनणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण सहज उपलब्ध झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या सोयीनुसार शिकण्याची संधी मिळत आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे सहकारी पतसंस्थांमधील मनुष्यबळ अधिक सक्षम होण्यास आणि सहकार क्षेत्रातील बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते.
– अद्वैत माडगूळकर, सहकार क्षेत्रातील विश्लेषक व ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमाचे संकल्पक



















