

आमदार महेशदादांच्या वाढदिनी माणुसकीचा जागर; नगरसेवक योगेश लांडगे यांचा सेवाभावी उपक्रम!
जुन्नर तालुक्यातील कोपरे गावात २६७ गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि आनंदोत्सव नव्हे, तर समाजातील गरजू घटकांच्या जीवनात समाधानाची ज्योत प्रज्वलित करण्याची संधी! याच संवेदनशील भावनेतून भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नगरसेवक योगेश लांडगे यांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा गणातील कोपरे गावात २६७ गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
आमदार महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत, ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. अन्नधान्याच्या माध्यमातून कुटुंबांना दिलासा देतानाच, अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास या मदतीतून व्यक्त करण्यात आला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि ग्रामीण भागातील कुटुंबांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेता, गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा फलक, हार-तुरे आणि सत्कारांवरील अनावश्यक खर्च टाळून तो गरजूंच्या मदतीसाठी वळविण्याच्या संकल्पनेतून सुरू असलेली ही मोहीम समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ठरत आहे.
कोपरे गावातील २६७ कुटुंबांपर्यंत पोहोचलेली ही मदत म्हणजे केवळ अन्नधान्याचे वाटप नाही, तर माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि सामाजिक एकतेचा संदेश आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजातील संवेदनशीलता जिवंत ठेवतात आणि लोकसेवेच्या कार्याला नवी दिशा देतात.
प्रतिक्रिया :
“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त कोपरे गावातील २६७ गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला. वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजूंसोबत वाटून घेणे, हीच खरी लोकसेवा आणि माणुसकी आहे. संकटाच्या काळात प्रत्येक गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे, हे आमचे कर्तव्य आहे.”
योगेश लांडगे, नगरसेवक पिंपरी-चिंचवड महानगरपालिका



















