

वाय.सी.एम. औषधसाठ्याबाबत प्रसारित वृत्ताच्या अनुषंगाने महापालिकेचे स्पष्टीकरण
एफडीएचा छापा नसून महापालिकेने एफडीएला तपासणीकरिता पाठविण्यात आलेला व एफडीएने गुणवत्तेच्या मानांकन नुसार औषधे नसलेला असा अहवाल दिलेला औषधांचा साठा एफडीए तर्फे नेण्यात आला
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वाय.सी.एम.) येथील औषध भांडारातील औषधांच्या गुणवत्तेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त होताच महापालिकेने अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे तपासणीसाठी पाठपुरावा केला. FDA च्या अहवालानुसार संबंधित औषधे गुणवत्तेच्या मानकांनुसार नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उत्पादक कंपनी व पुरवठादाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयाकडून दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी Cap. B-Complex with Zinc (CareZinc) या औषधांच्या गुणवत्तेबाबत गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मोशी यांना पत्राद्वारे सदर औषधांचा साठा तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्याच्या वापरयोग्यतेबाबत अहवाल देण्याची विनंती केली. तत्पूर्वी महापालिकेने सदर औषधांचा साठा वापरास प्रतिबंधित करून बाजूला ठेवलेला होता. त्यानुसार FDA च्या अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी संबंधित औषधांचा नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतला. सदर औषधांचा पुरवठा मे. श्रीविनायक फार्मा, पुणे यांच्यामार्फत Inducare Pharmaceuticals and Research Foundation, Jejuri MIDC, Pune या उत्पादक कंपनीकडून करण्यात आला होता.
त्यानंतर FDA कडून दि. १६ जुलै २०२६ रोजी प्राप्त अहवालामध्ये Cap. B-Complex with Zinc हे औषध ‘Not of Standard Quality’ (गुणवत्तेच्या निर्धारित मानकांनुसार नसलेले) असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या अहवालाच्या अनुषंगाने महापालिकेने दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित उत्पादक कंपनी Inducare Pharmaceuticals and Research Foundation यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी काळ्या यादीत (Black List) समाविष्ट केले. तसेच औषधांचा पुरवठा करणाऱ्या मे. श्रीविनायक फार्मा, पुणे यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिबंधित करण्यात आले.
यानंतर FDA कार्यालयाकडून दि. २७ जुलै २०२६ रोजी संबंधित कंपनी मे. श्रीविनायक फार्मा यांनी पुरवठा केलेल्या १२ प्रकारच्या औषधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ११ प्रकारची औषधे ‘Not of Standard Quality’ असल्याचे, तर २ औषधे निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार असल्याचे महापालिकेस कळविण्यात आले. त्यानुसार FDA कार्यालयाकडून दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित ११ प्रकारच्या औषधांचा संपूर्ण साठा तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला.
सदर ११ प्रकारच्या औषधांच्या साठ्याची एकूण किंमत ११ लाख ९५ हजार ८६३ रुपये (₹११,९५,८६३) इतकी आहे. तथापि, काही वृत्तांमध्ये ₹१ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ (₹१,७२,७५,१२६) किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम आणि FDA कडून ताब्यात घेण्यात आलेल्या ११ प्रकारच्या औषधांच्या प्रत्यक्ष साठ्याची किंमत यामध्ये तफावत असून, संबंधित ११ औषधांच्या साठ्याची किंमत ₹११,९५,८६३ इतकी असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी कोणतीही रक्कम महापालिकेतर्फे पुरवठादार कंपनीस अदा करण्यात आलेली नाही.
औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने FDA कडे तपासणीसाठी पाठपुरावा केला असून, प्राप्त अहवालाच्या आधारे संबंधित उत्पादक व पुरवठादाराविरुद्ध तीन वर्षांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टीने महापालिका औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत आवश्यक ती दक्षता घेत असून, औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याची नियमानुसार तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
“वाय.सी.एम. रुग्णालयातील औषधांच्या साठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून कोणतीही छापेमारी (Raid) करण्यात आलेली नाही. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेत संबंधित औषधांचा साठा तपासणीसाठी FDA कडे पाठविला होता. औषधांच्या गुणवत्तेची खात्री करणे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने महापालिकेने ही कार्यवाही केली. त्यामुळे FDA कडून छापेमारी करून औषधसाठा जप्त केल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही.”
– डॉ. लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कोट:
“औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने तातडीने संबंधित औषधांचा साठा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली. FDA कडून वाय.सी.एम. रुग्णालयात कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, औषधांची गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेतला होता. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उत्पादक कंपनी व पुरवठादाराविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये, यासाठी या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.”
– कुलदीप जंगम अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



















