
स्वीकृत नगरसेवकांचा आज फैसला ?
– इच्छुकांसह कार्यकर्त्यांचे निवडीकडे लक्ष, यादीत नाव तरी इच्छुकांची धुकधूक सुरुच
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वीकृत दहा नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधारी भाजपकडून वेगवेगळ्या कारणांनी मागील दहा महिन्यांपासून सातत्याने लांबणीवर टाकण्यात आला. मात्र, येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावे दिली जातील, असे जवळपास निश्चित झाले आहे. हा तिढा अखेर सुटणार असून, राष्ट्रवादीच्या तीन जणांसोबत भाजपच्या सात जणांना ही संधी मिळणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जणांना स्वीकृत पदावर संधी दिली. मात्र, भाजपकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित झाली नाहीत. राष्ट्रवादीने दिलेल्या नावात बदल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. या गोंधळात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा तिढा सुरू होता. हा प्रस्ताव विविध कारणे देत सत्ताधाऱ्यांकडून लांबणीवर टाकण्यात येत होता.
स्वीकृत निवड लांबणीवर टाकण्यावरून इच्छुकांकडून व राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जात होता. अखेर भाजपकडून स्वीकृत नगरसेवक नियुक्ती करण्याचे निश्चित झाले आहे. आज २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तहकूब सर्वसाधारण सभेत स्वीकृत नियुक्तीचा विषय मान्यतेसाठी आहे. राष्ट्रवादीची तीन नावे निश्चित झालेली आहेत. आता भाजपकडून सात नावे या सभेत देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगितले जात आहे.
महापालिका सभेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी आहे. त्यासोबत नियमानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. पक्ष स्तरावर चर्चा करून निर्णय निश्चित झालेला आहे. – प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते, भाजप



















