
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, कणखर नेतृत्व, दूरदृष्टी आणि निर्णायक कार्यशैलीच्या प्रतीक असलेल्या भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
“इंदिराजी गांधी यांचे धैर्य, कणखर नेतृत्व, देशाप्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीची बांधिलकी ही आजही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करून स्व.इंदिराजींना आदरांजली वाहत आहोत” असे नरेंद्र बनसोडे म्हणाले.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिराजी गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरितक्रांती, देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची उंचावलेली प्रतिष्ठा या त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव उपस्थितांकडून करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप शिंदे, सुरज माने, रामकिसन माने, हरीश डोळस, हिराचंद जाधव, सरचिटणीस नबील मुल्ला, कृष्णा जाधव, गौरी नरसिंगे, रवींद्र कुंभार, प्रदीप शर्मा, गौतम सरपाते, रिझवान खान, विल्यम साळवी, अशोक माने, प्रमोद गायकवाड, राजेंद्र वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















