
उद्योगमंत्री उदय सामंत, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची उपस्थिती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षाच्या आगामी उपक्रम आणि संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पक्षाची महत्त्वाची आढावा बैठक गुरुवारी (१९ नोव्हेंबर) थेरगाव येथील मोरया बँक्वेट हॉल येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उदय सामंत, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मतदार यादीच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. मतदार यादीविषयीची सविस्तर चर्चा केली जाणार आहे. संघटनात्मक कामांवर चर्चा होणार आहे. संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पक्ष विस्ताराच्या कामाचा आढावा यादरम्यान घेतला जाईल. शहरात मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातून होणाऱ्या संघटनात्मक प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नव्याने प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत शिवसेना पक्षाची संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातून येऊन स्थायिक झालेल्या आणि वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना पक्षीय पातळीवर काय मदत करता येईल, यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.



















