
अहिल्यानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रवर्तक परमपूज्य कुंदनऋषिजी महाराज साहेब यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त आनंद नवकार परिवार ट्रस्टच्या वतीने जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार दिवाकर परमपूज्य आलोकऋषिजी महाराज साहेब यांच्या सानिध्यात हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी साध्वी परमपूज्य अनंतज्योतीजी महाराज साहेब यांच्या सुशिष्या आयंबिल आराधिका परमपूज्य अपूर्वज्योतीजी महाराज साहेब यांच्या १०८ आयंबिल तपस्येची पूर्णाहुती झाली. त्यानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
तसेच समर्पण चातुर्मासाचे प्रमुख लाभार्थी सौरभजी बोरा आणि चातुर्मास समितीचे अध्यक्ष अशोकजी ऊर्फ बाबूशेठ बोरा यांना समाजरत्न व समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी परमपूज्य आलोकऋषिजी महाराज साहेब यांनी आपले गुरू कुंदनऋषिजी महाराज साहेब यांच्याकडून मिळालेले संस्कार, शिक्षण, स्नेह आणि साधेपणा याविषयी मनोगत व्यक्त केले.
आनंद नवकार परिवार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषिजी महाराज साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वात संयम, साधना, सरलता, स्वाध्याय आणि गुरुभक्ती या गुणांचा सुंदर संगम आहे. आनंद पार्श्व गुरुकुलची स्थापना आणि शाळेच्या इमारतीचे बांधकाम त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून तसेच परमपूज्य आलोकऋषिजी महाराज साहेब यांच्या परिश्रमातून साकार झाले आहे.”
संस्थेचे सचिव मनोजजी शेठिया यांनीही कुंदनऋषिजी महाराज साहेब हे अहिल्यानगरसाठी मोठे संस्कारपीठ आणि ज्ञानपीठ असल्याचे सांगितले. शेकडो भक्तांना ते दररोज प्रसन्नतेने मंगलपाठ ऐकवतात, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सदस्यांनी कुंदनऋषिजी महाराज साहेब यांना ९३ व्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.



















