
आळंदीत १ ते ८ डिसेंबर काळात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी दिन सोहळा
कार्तिकी यात्रेचे धार्मिक कार्यक्रम जाहीर
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदीत 1 ते 8 डिसेंबर दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा (कार्तिकी यात्रा) यंदा कार्तिक वद्य अष्टमी (मंगळवार, दि. १ डिसेंबर) ते कार्तिक वद्य अमावस्या (मंगळवार, दि. ८ डिसेंबर) या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न होणार आहे.
आळंदी देवस्थानच्या वतीने या यात्रेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या सोहळ्याची सुरुवात मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी वै. श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने होणार असून, याच दिवशी संत नामदेव महाराज आणि भगवान श्री पांडुरंगांचे पालखी सोहळे आळंदीत दाखल होतील.
शुक्रवार, दि. ४ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार असून, या दिवशी दुपारी १२.३० ते १.०० वाजेच्या दरम्यान श्रींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडेल.
त्यानंतर शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य रथोत्सव सोहळा पार पडेल. यात्रेचा मुख्य दिवस असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा रविवार, दि. ६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. कार्तिकी यात्रेची सांगता मंगळवार, दि. ८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत निघणाऱ्या श्रींच्या पालखी छबिना मिरवणुकीने होईल.
संपूर्ण यात्रा कालावधीत श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा व परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन आणि जागरादी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.



















