
विचार बदला, आयुष्य बदलेल! बी.के. शिवानी दीदींचा १० हजार नागरिकांना सकारात्मकतेचा संदेश
जालना, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विचारांमध्ये बदल घडवून आणल्यास आयुष्यही बदलू शकते, असा सकारात्मकतेचा आणि मानसिक शांततेचा संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगिनी बी.के. शिवानी दीदी यांनी दिला. जालना येथे आयोजित भव्य आध्यात्मिक मार्गदर्शन सोहळ्याला तब्बल १० हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
माजी मंत्री राजेश भैय्या टोपे आणि ब्रह्माकुमारी परिवार यांच्या वतीने सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी जालना येथील एज्युकेशन सोसायटीच्या आर. जी. बागडिया कला, एस. बी. लखोटिया वाणिज्य आणि आर. बी. बेझोनजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार गणपती वंदना सादर केली. आयोजक राजेश भैय्या टोपे यांनी बी.के. शिवानी दीदी यांचे स्वागत केले.
मार्गदर्शन करताना शिवानी दीदी यांनी राग, भीती, चिंता, ताण आणि नकारात्मकता यापासून मनाला दूर ठेवण्याचे आवाहन केले. आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात मन अस्वस्थ झाले असून, दररोज काही मिनिटे राजयोग ध्यान केल्याने मन शांत राहते, एकाग्रता वाढते आणि निर्णयक्षमता सुधारते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, इतरांशी तुलना न करता मनापासून अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच पालकांनी मुलांवर रागावण्याऐवजी प्रेमाने समजून घ्यावे, असे आवाहन केले. घरातील नातेसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांचा आदर, समजूतदारपणा आणि माफ करण्याची वृत्ती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण आपला विचार बदलून आपले आयुष्य नक्कीच बदलू शकतो,” हा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक ध्यानाने झाला.
या सोहळ्याला खासदार डॉ. कल्याणराव काळे, माजी विरोधी पक्षनेते अंबादासराव दानवे, आमदार नारायणराव कुचे, आमदार प्रतापसिंह पाटील, तसेच विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



















