
भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्यात अनुशासन समितीची घोषणा; सहा जणांचा समावेश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा संघटनेतील शिस्त आणि अनुशासन अधिक बळकट करण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी अनुशासन समितीची घोषणा केली आहे. या समितीत सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे.
पक्ष संघटनेचे काम सुरळीत चालावे, संघटनेचा विस्तार व्हावा आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी अफवा व खोट्या प्रचाराला बळी न पडता पक्षाचे काम करावे, या उद्देशाने समिती स्थापन करण्यात आली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन करणे, पक्षांतर्गत शिस्त न पाळणे किंवा पक्षविरोधी भूमिका घेणे अशा प्रकरणांमध्ये संबंधित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे अधिकार समितीला देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे :
1. सदाशिव दादासाहेब खाडे
2. आमदार उमा गिरीश खापरे
3. ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
4. ॲड. गोरखनाथ गेनबा झोळ
5. प्रशांत कृष्णराव शितोळे
6. विकास हरिश्चंद्र डोळस
पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विधिज्ञ, लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षांतर्गत शिस्त राखण्यासह संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्पष्ट केले.



















