
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला. प्रदीर्घ मतमोजणीनंतर ४४ व्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला. हर्षदा देशमुख-जाधव यांना अखेर १ लाख १३ हजार ८४० मते मिळाली, तर स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारासाठी प्रचार करूनही पक्षाला या जागेवर विजय मिळविता आला नाही. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकत मतदारसंघावरील आपला ताबा कायम राखला आहे.
मतमोजणीच्या २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली होती. त्याच वेळी भाजपच्या स्मिता जाधव यांच्या खात्यात १ लाख २ हजार ४२७ मते होती. या टप्प्यावर देशमुख-जाधव यांनी ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर झालेल्या बाद फेऱ्यांमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या मतांत वाढ होत गेली. मात्र, देशमुख-जाधव यांनी आपली आघाडी कायम राखली. ३९ बाद फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर त्यांची मतसंख्या १ लाख ११ हजार ७१७ वर पोहोचली होती. स्मिता जाधव यांना तोपर्यंत १ लाख २ हजार ७९७ मते मिळाली होती. या टप्प्यावर दोघींमधील मतांचे अंतर ८ हजार ९२० इतके होते.
अखेर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ४४ वी बाद फेरी निर्णायक ठरली. या फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांनी १ लाख १३ हजार ८४० मतांचा टप्पा गाठला. आवश्यक कोटा पूर्ण झाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. स्मिता जाधव यांना अंतिमतः १ लाख ३ हजार ९१२ मते मिळाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणालाही आवश्यक कोटा गाठता न आल्याने नंतरच्या बाद फेऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले. त्या फेऱ्यांमध्येही देशमुख-जाधव यांनी आघाडी कायम ठेवत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.
हर्षदा देशमुख-जाधव यांचे वडील प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त तसेच विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या काळात विभागातील विविध भागांत तयार झालेला त्यांचा जनसंपर्क निवडणुकीत कामाला आल्याचे निकालावरून दिसत आहे. प्रभाकर देशमुख यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढत दिली होती. त्या निवडणुकीतील अनुभवाचाही या वेळी उपयोग झाल्याचे मानले जात आहे.



















