
सांगवीतील संविधान शिल्पाची तोडफोड प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा; युवासेनेचा पोलीस आयुक्तांना इशारा!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी येथील संविधान चौकातील संविधान शिल्प धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी बुलडोझरने पाडण्यात आल्याच्या प्रकरणी संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना (शिवसेना) तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
दि. १४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी भाजपच्या नगरसेविका तृप्ती कांबळे आणि त्यांचे पती संतोष कांबळे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस आयुक्तालयाला पत्र दिल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कारवाईबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवून तपास करावा, तसेच महानगरपालिकेच्या पत्रावर कोणती कार्यवाही झाली, याची माहिती द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
संविधानाचा सन्मान आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यासाठी तातडीने कारवाई करावी; अन्यथा युवासेना (शिवसेना) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



















