
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन
१ ते १९ वर्षे वयोगटातील बालके व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे करण्यात येणार वितरण
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालकांचे आरोग्य सुधारावे, त्यांची पोषणस्थिती उंचावावी आणि जंतसंसर्गापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील पात्र बालके व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.
या मोहिमेत महानगरपालिका शाळांसह शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेल्या इतर शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. शाळाबाह्य बालके व किशोरवयीन मुला-मुलींपर्यंतही या मोहिमेचा लाभ पोहोचविण्याचे नियोजन आहे. शाळांमध्ये शिक्षकांच्या देखरेखीखाली, तर अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
मॉप-अप दिनी वंचित लाभार्थ्यांना मिळणार संधी
दि. २७ ऑक्टोबर रोजी विविध कारणांमुळे जंतनाशक गोळी घेऊ न शकलेल्या बालकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित मॉप-अप दिनी गोळी देण्यात येईल. यासाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांनी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा व अंगणवाडी केंद्रांनी गोळी दिलेल्या लाभार्थ्यांची नोंद ठेवावी. राष्ट्रीय जंतनाशक दिनी गोळी दिलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एक खूण, तर मॉप-अप दिनी गोळी दिल्यानंतर दोन खुणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
“बालकांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जंतसंसर्गापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके व विद्यार्थ्यांसाठी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
“जंतसंसर्गामुळे बालकांच्या आरोग्यावर आणि पोषणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १ ते १९ वर्षे वयोगटातील पात्र बालकांना राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या मोहिमेद्वारे गोळी देण्यात येणार आहे. ही मोहीम शाळा, अंगणवाड्या आणि नियोजित आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येईल. २७ ऑक्टोबर रोजी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे. पालकांनी सहकार्य करून आपल्या पाल्यांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे.”
— डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.



















