
नवदुर्गा उत्सवाच्या काळातच आकुर्डीत महावितरण कार्यालयात महिला कर्मचाऱ्यावर अतिप्रसंग!दहा दिवसांनंतरही कारवाई नाही
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महिलांना समाजात वावरताना मानहानी आणि जीवन उध्वस्त करणाऱ्या प्रसंगांना दरदिवशी सामोरे जावे लागते. अशा घटनांना मुकदर्शक म्हणून बघणाऱ्या लोकांची चीड येणे स्वभाविक असून, आकुर्डीत महावितरण कार्यालयात काम करत असलेल्या एका महिलेचा विनयभंग पुरुष कर्मचाऱ्याने केल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे नवदुर्गा उत्सवाच्या काळात ही घटना घडली होती आणि घटना घडून गेल्यावर लगेच आकुर्डी उपविभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता याला सगळी माहिती दिली पण अद्याप काहीही कारवाई झाली नसल्याने अशा महिलांनी जीवन कसे जगावे? असा प्रश्न यानिमित्त उद्भवत आहे. सुमारे दहा दिवसांनंतरही राक्षसी कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने सरकारी अनास्था महिला कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू लागण्याची चर्चा आता होत आहे.आणि शक्तीच्या उत्सवात जर असे प्रसंग घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेवर यानिमित्त गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सदर घटना १६ऑक्टोबर ला घडली होती आणि सदर महिला महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवार कर्मचारी असून, महावितरण आकुर्डी कार्यालयात कामाला आहे. या कार्यालयाच्या खालच्या मजल्यावर स्वीचिंग स्टेशन असून, तिथे काम करणाऱ्या ऑपरेटर ने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तत्काळ आकुर्डी उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला देण्यात आली परंतु दहा दिवस उलटून गेले तरीही अद्याप संबंधित ऑपरेटर वर कारवाई झाली नसल्याने सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.याची तक्रार महिलेकडून महावितरण अंतर्गत असलेल्या विशाखा समितीला देखील करण्यात आली असून, त्यावरही “हाताची घडी तोंडावर बोट” असेच धोरण दिसून येत आहे.विशेष म्हणजे महिलांच्या आस्थेचा विषय असलेल्या नवदुर्गा उत्सवाच्या काळात ही घटना घडली आणि महावितरणने त्याच कार्यालयात घटना घडल्याच्या दिवशीच नवदुर्गा उत्सवानिमित्त काही महिलांचा सन्मान केला.आणि खरा सन्मान ज्या महिलेला आपल्या आचरणातून दिला जाणे अपेक्षित असताना ज्या दुर्गेवर अन्याय झाला त्याबाबत कुणालाही काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसून येत आहे.असे जर अधिकारी असतील तर कोण महिला काम करायला मागेल?त्यात कहर म्हणजे महिलेची उचलबांगडी करून तिला भोसरी विभागात नियुक्ती दिली परंतु अतिप्रसंग करणाऱ्या त्या राक्षसाला महावितरणने अद्याप काहीही शिक्षा केलेली नाही आणि त्याला अप्रत्यक्षपणे अभय देण्याचे धोरण दिसत आहे. याबाबत काही मंडळींनी सरकारी वरिष्ट अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता,अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांनी नियमांत कारवाई करणार असल्याची सरकारी उत्तरे दिली.याबाबत संबंधित महिलेला अशा पद्धतीने सरकारी खात्यात अतिप्रसंगाच्या घटनेला सामोरे जावे लागत असताना जर कारवाईबाबत अशी अनास्था असेल तर बाकी महिलांवर काय प्रसंग असतील? याची कल्पनाही न केलेली बरी असेच म्हणावे लागेल.येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास महिलांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर आणण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणला दिला आहे.



















