
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- रावेत, प्राधिकरण आकुर्डी सेक्टर २३ येथे प्रस्तावित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा अविनाश मोरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली.
या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, दुर्गा टेकडीचे पर्यावरण, जैवविविधता तसेच शैक्षणिक व निवासी वातावरणावर संभाव्य परिणाम होण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. परिसरातील लाखो नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
“शहराच्या विकासाला आणि कचरा व्यवस्थापनाला विरोध नाही; मात्र नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात घालून विकास होता कामा नये,” असे शैलजा मोरे यांनी स्पष्ट केले.
शहरातील कचरा समस्येवर उपाय म्हणून कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, पुनर्वापर, बायोमिथेनेशन आणि विकेंद्रित कचरा प्रक्रिया यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली. नागरिकांच्या हरकती आणि परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन महानगरपालिकेने योग्य निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, राजू बाबर, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, माजी महापौर आर. एस. कुमार आणि समीर मोरे उपस्थित होते.
दुर्गा टेकडीचे संवर्धन, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण राखण्यासाठी हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



















