
लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यसंस्कारासाठी दोन लोखंडी रॅक बसविण्याची मागणी; नगरसेवक शेखर चिंचवडे यांचा पाठपुरावा
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड गावातील नागरिकांना लाकूड व गोवऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी नगरसेवक तथा विधी समिती सदस्य शेखर बबनराव चिंचवडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात आमदार शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत दोन लोखंडी (बिडाचे) रॅक बसवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चिंचवड गावातील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज समाधी मंदिरापासून काही अंतरावर असलेली स्मशानभूमी अनेक पिढ्यांपासून चिंचवडकरांच्या पारंपरिक अंत्यसंस्काराचे ठिकाण होती. मात्र, २००२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ही स्मशानभूमी हटविल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली. या घटनेला २४ वर्षे उलटूनही पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा पूर्णपणे उपलब्ध झालेली नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी काळेवाडी, रावेत किंवा निगडी येथे जावे लागत आहे.
नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चिंचवड-काळेवाडी पुलाजवळ चिंचवड हद्दीत सुमारे दोन वर्षांपूर्वी विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी विद्युत दाहिनी आणि लाकूड व गोवऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा या दोन्ही स्वतंत्र गरजा असल्याचे चिंचवडे यांनी स्पष्ट केले.
हिंदू संस्कृतीत अंत्यसंस्काराला धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. अनेक कुटुंबांना आपल्या धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असते. त्यामुळे नागरिकांच्या भावना आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात स्मशानभूमीतील जागेची पाहणीही करण्यात आली आहे. महानगरपालिकेने हा विषय केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता चिंचवडकरांच्या २४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामाजिक आणि भावनिक प्रश्नाच्या दृष्टीने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक शेखर चिंचवडे यांनी व्यक्त केली.
२४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता तोडगा निघणार का आणि चिंचवडकरांना पारंपरिक अंत्यसंस्काराची सुविधा मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



















