
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, मोठ्या निवासी इमारती आणि गृहप्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची मागणीही वाढत असून, भविष्यात नागरिकांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे नाना काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्र. ४/११२ (खेळाचे मैदान – PG) या आरक्षित जागेतून आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारता येईल. यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे शक्य होणार असून, नागरिकांना भविष्यात मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या मागणीची दखल घेऊन संबंधित जागेची पाहणी करावी, नियमानुसार आवश्यक मंजुरी व तांत्रिक कार्यवाही पूर्ण करावी आणि जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.



















