
जुनी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बुद्धघोष बुद्धविहार, बुद्धघोष हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे महत्त्व अधोरेखित करत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आत्मसन्मानाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या विचारमंचावर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. दीपक गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र इंगोले, तक्षशिला महिला संघाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते आणि बुद्धघोष हौसिंग सोसायटीचे चेअरमन शरद जांभळीकर उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रा. अर्चना कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. दीपक गायकवाड यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. दीपक गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात धम्मचक्र प्रवर्तन दिन हा ऐतिहासिक धम्मक्रांतीचा दिवस असल्याचे सांगितले. या क्रांतीमुळे शोषित-वंचितांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. धम्मक्रांतीचा विचार गतिमान करण्यासाठी विहारात तसेच विहाराबाहेर विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. रवींद्र इंगोले यांनी धम्मक्रांतीमुळे वंचितांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाल्याचे सांगितले. अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, विषमतेकडून समानतेकडे आणि अपमानाकडून आत्मसन्मानाकडे जाण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला. जातिभेदातून मुक्ती, शिक्षणाचा प्रसार आणि स्त्री-पुरुष समानतेची प्रतिष्ठापना यांसाठी बौद्ध धम्मदीक्षेचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रा. रवींद्र इंगोले यांच्या हस्ते मान्यवरांचा गुलाबपुष्प आणि ‘धम्मक्रांती’ हा अंक देऊन सत्कार करण्यात आला. बुद्धघोष हौसिंग सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगवी पूर्व, तक्षशिला महिला संघ आणि बुद्धघोष मित्र मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत दुर्गे यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रा. अर्चना कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शरद जांभळीकर, अरुण रणदिवे, आनंद महाडिक, चंद्रकांत दुर्गे, ज्ञानेश्वर खाडे, शुभम गायकवाड, अशोक खाडे आणि सुरेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















