
डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ प्रदान
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या लोककलेसाठी अभिमानाचा क्षण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तथा प्रसिद्ध कीर्तनकार, भारुडकार, प्रवचनकार डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार २०२४’ सोमवारी ( दि. १९ ) प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील रवींद्र भवनच्या मेघदूत थिएटरमध्ये हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात झाला. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते डॉ. देखणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास सचिव,भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय विवेक अग्रवाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या पुरेचा यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले.
या वर्षी अकादमीकडून सन २०२४ सालासाठी देशभरातील एकूण ५१ कलाकारांना तर २०२५ सालासाठी ५५ कलाकारांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०२४ च्या पुरस्कारांमध्ये लोककला प्रकारात महाराष्ट्रातून पुरस्कार डॉ. भावार्थ देखणे यांना ‘भारुड’ या प्रबोधनात्मक लोककलेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारुडाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा आणि लोकप्रबोधनाचा वारसा देशभर तसेच परदेशात पोहोचवण्याच्या त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी डॉ. देखणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.



















