
घरकुल स्पाईन रोडवरील आरंभ हॉटेलशेजारी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली; तीन तासांपासून पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घरकुल स्पाईन रोड सर्व्हिस रोडवरील आरंभ हॉटेलशेजारी पिण्याच्या पाण्याची मोठी पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या तीन तासांपासून पाइपलाइनमधून पाणी वाहत असल्याचा आरोप करण्यात येत असून, या घटनेची तातडीने दखल घेण्याची मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.
शहरात एकीकडे पाणीटंचाईचे संकट असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची अशा प्रकारे नासाडी होणे ही गंभीर बाब आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामामुळे पाइपलाइन फुटली असल्यास, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाइपलाइन फोडणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मारुती जाधव यांनी केली आहे.
पाइपलाइन फुटण्यास नेमके कोण जबाबदार आहे, काम करताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का आणि पाइपलाइन फुटल्यानंतर दुरुस्तीसाठी विलंब का झाला, या सर्व बाबींची चौकशी करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून पाइपलाइनची दुरुस्ती करावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी. तसेच, चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
“शहरात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. मग पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटून तासन्तास पाणी वाया जात असताना संबंधित यंत्रणा काय करत आहे? पाइपलाइन फुटण्यास जबाबदार असलेल्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी मारुती जाधव यांनी केली.
या प्रकरणी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— मारुती गणपत जाधव यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी.



















