
ऐश्वर्यंम सोसायटीत विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन सोहळा उत्साहात ; विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची उपस्थिती
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऐश्वर्यंम सोसायटी, निगडी नगर (देहू गट) यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजनाचा सोहळा ऐश्वर्यंम कम्फर्ट,आकुर्डी मागील पालिका मैदान येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नगरसेवक कैलास कुटे, मीनलताई यादव, विशाल काळभोर आणि गणेश लंगोटे यांची विशेष उपस्थिती लाभली. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे समरसता गतिविधी सहसंयोजक विलासराव लांडगे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त शस्त्रपूजन करून राष्ट्रभक्ती, शिस्त, संस्कार, सामाजिक समरसता आणि राष्ट्रसेवेचा संकल्प दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात अमृतवचन, सुभाषित, सांघिक पद्य, वैयक्तिक पद्य आणि प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार कुलकर्णी यांनी मुख्य शिक्षक, धनंजय पुराणिक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, निखिल भोसले यांनी प्रास्ताविक परिचय, मंगेश अवसेकर यांनी अमृतवचन, पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी सुभाषित, तर नाना कुलकर्णी यांनी पद्य सादर .केले, इतर स्वयंसेवकांनीही व्यवस्थापन, सजावट, शस्त्रपूजन, पाहुणचार आणि विविध व्यवस्थांसाठी मोलाचे योगदान दिले.
सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध सहभागातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. अशा उपक्रमांमधून समाजात एकात्मता, संघभावना, संस्कार आणि राष्ट्रहिताची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निगडी नगर (देहू गट) यांच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, स्वयंसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.



















