
“महिलांनी महिलांना साथ देणे हीच काळाची गरज!” – नगरसेविका वर्षा जगताप
नवरात्रोत्सवातून स्त्रीशक्तीचा जागर; महिला सक्षमीकरणाचा दिला संदेश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवरात्रोत्सव म्हणजे देवीच्या विविध रूपांची उपासना आणि स्त्रीशक्तीचा जागर. आज महिला घरकामापासून ते अवकाश क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. मात्र, महिलांनी अधिक प्रगती करण्यासाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेला साथ देणे आणि तिला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत नगरसेविका तथा विधी समिती सदस्य वर्षा जगताप यांनी व्यक्त केले.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे, ही सकारात्मक बाब आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये एकोपा वाढतो आणि परस्परांना समजून घेण्याची संधी मिळते. येणाऱ्या काळात महिलांच्या प्रगतीसाठी ही एकजूट अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इतिहासात महिलांच्या योगदानाला महत्त्वाचे स्थान आहे. आज देशाच्या राष्ट्रपतीपदापासून ते सैन्यदल, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या स्त्रीशक्तीचा एक भाग म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे वर्षा जगताप यांनी नमूद केले.
महिलांनी एकमेकींच्या यशाचा आनंद साजरा करावा, एकमेकींच्या संघर्षात साथ द्यावी आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. नवरात्रोत्सव हा केवळ देवीच्या पूजेपुरता मर्यादित न राहता महिलांच्या सामर्थ्याचा, एकतेचा आणि सक्षमीकरणाचा उत्सव ठरावा, असा संदेशही नगरसेविका वर्षा जगताप यांनी दिला.



















